कृष्णा काठची मेजवानी
महाराष्ट्र हा खाण्यापिण्याच्या बाबतीत समृद्ध आहे. कोकण, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असे मुख्य चार विभाग मानले तरी प्रत्येक विभागात पुन्हा अनेक खाद्यसंस्कृती सामावल्या गेल्या आहेत. प्रत्येकाची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. कोकणातले आंबा-फणस आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ, नागपूरची संत्री आणि संत्रा बर्फी वगैरे. त्या त्या भागातील लोकांनी आपली खास वैशिष्ट्य असलेले हे पदार्थ महाराष्ट्रातल्या इतर भागात उपलब्ध करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत, करत आहेत. त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील एखाददोन पदार्थ वगळता बाकीचे पदार्थ इतरत्र फारसे मिळत नाहीत. रमा पोतदार यांनी हे लक्षात घेतलं आणि पश्चिम महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीची चव इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा निश्चय केला. त्यासाठी कृष्णाकाठची मेजवानी (कृष्णातिरीच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद) हा ब्रॅंड तयार केला.
कृष्णाकाठची मेजवानी या ब्रॅंडखाली सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ ग्राहकांना दिले जातात. नरसोबाच्या वाडीची बासुंदी, खवा, पेढे, कवठाची बर्फी तर सांगलीचे चुरमुरे, हळद, कोल्हापूरचे मसाले, सातारा परिसरातला मध आणि गुलकंद असे पदार्थ त्या ग्राहकांसाठी उपलब्ध करतात.
खरंतर रमा पोतदार या संगीत विशारद झालेल्या आहेत. पुण्यातल्या एका नामवंत शाळेत त्या संगीत शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांचं माहेर नरसोबाच्या वाडीचं. लग्न झाल्यावर त्या पुण्यात आल्या. पुण्यात नोकरी करत असतानाच त्यांनी हँड बॅग्जचा व्यवसायही सुरू केला. त्यासाठी डीसके विश्वमध्ये त्यांनी एक दुकान घेतलं. शाळेच्या वेळा सांभाळून गंधार बॅग्स अँड कॉसमॅटिक्स या नावाने रमा हा व्यवसाय करत होत्या, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे श्रावण महिन्यात सणावारी लोकांना गोडधोड लागतं म्हणून त्यांनी हँड बॅग्जच्या दुकानात वाडीची बासुंदी आणून विक्रीसाठी ठेवली. ती हातोहात खपली. त्यानंतर येणाऱ्या पाडव्याला तर 200-300 किलो बासुंदीची ऑर्डर त्यांनी पूर्ण केली. बासुंदीला मिळणारा प्रतिसाद बघून आणखी एक दोन प्रोडक्टस आणून विकले. तेही खपले. फूड प्रोडक्टसला सतत मागणी असते हे त्यांच्या लक्षात आलं.
याच दरम्यान रमा दुबई येथे एक खाद्यपदार्थ विषयक प्रदर्शन बघायला गेल्या. कोरोनाने आपले हातपाय पसरण्यापूर्वी काहीच दिवस आधी त्यांचा हा दौरा झाला. तिथे भारतातले अनेक प्रोडक्टस त्यांना बघायला मिळाले. बिकानेरी, राजस्थानी, कोकणी अशी नाना प्रकारची उत्पादनं तिथे होती. मात्र पश्चिम महाराष्ट्रातली कुठलीच उत्पादनं त्यांना दिसली नाहीत. कृष्णा नदीच्या काठावर दुधदुभत्याची इतकी संपन्नता असताना, खवा-बासुंदी यासारखे उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ असताना ही उत्पादनं जगभर पोचायला हवीत हे त्यांना प्रकर्षाने जाणवलं. त्यातूनच कृष्णाकाठची मेजवानी या ब्रॅंडची कल्पना त्यांच्या मनात साकार व्हायला लागली.
ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या पुरवठादारांशी कंत्राट केलं. मसाल्यांसाठी महिला बचत गटांची मदत घेतली. वर सांगितलेले पदार्थ पुण्यात मागवून त्याला सुटसुटीत पॅकिंग करून कृष्णाकाठची मेजवानी या ब्रॅंड नेमने विक्री सुरू झाली. त्याचबरोबर परदेशात माल पाठवण्यासाठी त्यांनी व्हेक्सेल एक्सपोर्ट्स या नावाची कंपनी सुरू केली. सुरूवातीला तिकडे ताज्या फळं भाज्या पाठवायला सुरूवात झाली. त्याचं पॅकिंग, त्यासाठी घ्यावी लागणारी इतर काळजी व्हेक्सेल एक्सपोर्ट्स कंपनी घेत असे. रमा यांना कृष्णाकाठची मेजवानी या ब्रॅंडची ही सारी प्रोडक्टस परदेशातही गेली पाहिजेत असं मनापासून वाटतं. म्हणूनच त्यांनी त्याच्या निर्यातीसाठी लागणारे सारे परवाने आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता कृष्णाकाठची मेजवानीची उत्पादनं आता बाहेरच्या देशातही जातात. तिकडेही त्यांचा ग्राहकवर्ग आहे.
दरम्यानच्या काळात कोरोनाने सारं समाजजीवन ठप्प झालं. या काळात रमा यांनी आपलं डीएसके विश्वमधलं दुकान बंद केलं. आता कृष्णाकाठची मेजवानीचा सारा कारभार घरातूनच केला जातो. वेगवेगळ्या सोशल मीडियावर रमा त्यांच्याकडे असलेल्या प्रोडक्टसची जाहिरात करतात, ग्राहकांना माहिती देतात. ग्राहकांकडून आलेल्या ऑर्डर्स घरपोच करतात. पाच किलोमीटरच्या आतल्या ग्राहकांसाठी डिलिव्हरी चार्जेस आकारले जात नाहीत. त्यापेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्या ग्राहकांकडून डिलिव्हरी चार्जेस घेतले जातात. पेढे, बर्फी, आंबा बर्फी, गुलकंद बर्फी, कवठाची बर्फी यासारखे पदार्थ ऑर्डरनुसारच गणपतीच्या दिवसांत मागवले जातात. त्यामुळे ते खराब होण्याचा प्रश्न येत नाही. बासुंदी अतिशय थंड तापमानात ठेवली जाते. 6-8 महिने कोणत्याही प्रीझर्वेटिव्हजशिवाय ती अगदी छान राहते. सीताफळ बासुंदी, गुलकंद बासुंदी असे वेगळे स्वादही त्यात मिळतात. हळद, तिखट, मसाले हेही अगदी ताजे उपलब्ध असतात. त्यामुळेच पुण्यात आणि पुण्याबाहेरही त्यांचे ग्राहक आहेत. खास सांगलीचे बेदाणे, मनुके, चुरमुरे आणि खाजा ही खास मिठाई हेही उपलब्ध असतात. शिवाय दिवाळीसाठी आणि एरवीही बचत गटांकडून करून घेतलेले चिवडा, चकली यासारखे पदार्थही उपलब्ध असतात. या सगळ्या पदार्थांसाठी उत्तम दर्जाचं पॅकिंग मटेरियल वापरलं जातं. त्यामुळे पदार्थांचा ताजेपणा टिकून राहतो.
या सगळ्या व्यवसायातून दर महिन्याला 60-70 हजारांची उलाढाल होते. सध्या घरातूनच हा व्यवसाय होत असला तरी लवकरच रमा त्यासाठी एक आऊटलेट सुरू करणार आहेत. शिवाय वेगवेगळ्या शहरांमध्ये कृष्णाकाठची मेजवानीची फ्रान्चायजी द्यायची आहे. त्यामुळे ग्राहकांना सगळी उत्पादनं बघून हवी तेव्हा खरेदी करता येतील. या कामासाठी त्यांच्याकडे पॅकिंग करायला दोन माहिला आहेत तर डिलिव्हरी द्यायला दोन मुलं आहेत. कृष्णाकाठची मेजवानीला मिळणारा वाढता प्रतिसाद बघता या मेजवानीचा दरवळ लवकरच सर्वदूर पसरेल यात शंका नाही.